बारामती : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आक्रमक झालेला मराठा क्रांती मोर्चा थेट बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धडकणार आहे. पवार यांच्या शहरातील सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोरील शनिवारी (दि. २६) सकाळी ९ ते ११ वेळेत ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही स्थगिती राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने मिळाल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला मिळालेली ही स्थगिती राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मिळाली आहे. ही स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यापूर्वी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानासमोर शहर आणि तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यावेळी सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आवाहन देखील करण्यात आले. यामध्ये सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पाळण्याबरोबरच स्वत:ची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान बारामतीमध्ये महायुतीच्या सत्ता काळात यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट २०१८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये अजित पवार यांनी देखील त्यावेळी सहभाग घेतला होता. आता अजित पवार हे सत्ताधारी असून राज्यातील क्रमांक दोनच्या पदाची सुत्रे त्यांच्या हाती आहेत. आता त्यांच्या निवासस्थानासमोरच आंदोलन होणार आहे. ————————————————————