पुणे : मराठा आरक्षण समन्वय समितीमध्ये काम करणाऱ्या मराठा संघटनांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युतीने सन्मानाने बाेलावून 10 जागा दिल्यास युतीसाेबत जाणार परंतु त्या न मिळाल्यास राज्यात शंभर जागा लढविण्याचा निर्धार महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यात आज महाराष्ट्र क्रांती सेनेची बैठक पार पडली त्यानंतर माध्यमांशी बाेलताना त्यांनी प्रतिक्रीया दिली.
मराठा आरक्षण समन्वय समितीमध्ये गेली अनेक वर्षे राज्यभर मराठा समाजाचे काम करणाऱ्या 42 संघटनांचा समावेश असून, त्या संघटनांची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व संघटनांनी समाजकारणाकडून राजकारणाकडे जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला. तसेच मराठा आरक्षणाच्या चळवळीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षास जाहीर पाठींबा दिल्याची घाेषणा मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी आज पुण्यात केली.
सुरेश पाटील म्हणाले, दिवाळीच्या मुहुर्तावर रायरेश्वरावर महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची स्थापना करण्यात आली. राज्यात 20 जिल्ह्यात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करुन पक्षाची ताकद वाढवत आहाेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी या पक्षाला युतीतील घटक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. घटकपक्ष जरी असलाे तरी पक्ष राज्यात वाढविण्यासाठी मराठा समन्वय समितीचे प्रमुख विजयसिंह महाडिक यांच्याशी बैठक घेतली. त्यांच्यासाेबत असणाऱ्या 42 संघटनांनी पक्षाला जाहीर पाठींबा दिला आहे. विधासभेसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. 16 ऑगस्टपासून राज्यातील 100 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. आम्ही 10 जागांची मागणी युतीकडे केली आहे. आम्हाला युतीने सन्मानाने बाेलावून आमच्या वाट्याच्या जागा आम्हाला दिल्यास आम्ही युती साेबत राहू अन्यथा आम्ही राज्यातील 100 जागांवर उमेदवार उभे करु.