लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता आज ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवत सकल मराठा समाजाच्या वतीने लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी महाराज चौक ते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग गवळीवाडा दरम्यान पायी मोर्चा काढला. नंतर हा मोर्चा लोणावळा रेल्वे स्थानकावर जात १२-३४ वाजता मोर्चेकऱ्यांनी कोईमत्तुर लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही रेल्वे गाडी दहा मिनिटे रोखून धरत घोषणाबाजी केली. दहा मिनिटाने गाडी मुंबईकडे रवाना झाल्यानंतर काही काळ मराठा समाजाचे कार्यकर्ते हे रेल्वे पटारी व स्थानक परिसरात उभे होते. दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आज सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाकरिता सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. वाहने तोडफोडीच्या व जाळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता वाहनचालक मालक यांनी बंदला पाठिंबा देत वाहने रस्त्यावर न आणल्याने महामार्गावर शांतता पसरली आहे. मावळ तालुक्यात देखील बंदला शंभर टक्के पाठिंबा देण्यात आला. लोणावळा शहरासह संपूर्ण मावळातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा छोट्या मोठया कंपन्या , पेट्रोलपंप तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.