पुणे :मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवसाअखेर जिल्ह्यात कॅन्टोन्मेंट वगळता सुमारे सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे १४ टक्के आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर देहू व इंदापूर नगरपालिका क्षेत्रांमध्येही सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांची नावे समाविष्ट झाल्याने सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. मात्र, काही ठिकाणी ॲप संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी कायम आहेत.
सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रांत १ लाख ४७ हजार ३९५ कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रात १ लाख ७४ हजार २५७ कुटुंब तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १ लाख २ हजार २०२ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट वगळता जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, पुणे, देहू व खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील प्रगणकांची नोंदणी व प्रशिक्षण गुरुवारी पूर्ण झाले. त्यामुळे शुक्रवारपासून आता या तिन्ही कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे.
गेले दोन दिवस ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे प्रगणकांनी संकलित केलेली माहिती डॅशबोर्डवर दिसत नव्हती. ही समस्या दूर केल्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वेक्षणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय केंद्रात गोळा होऊ लागली आहे. कॅन्टोन्मेंट भागात सर्वेक्षण सुरू झाल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस शासकीय सुटी असली तरी सर्वेक्षणाचे काम सुरूच राहणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी जिल्ह्यातील संबंधित कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय कक्ष सुरू राहणार आहे. या तीन दिवसांत जास्तीत जास्त कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.