पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अटक केलेल्या १७० जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. येरवडा पोलिसांनी हयात हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेल्या १० जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी १९२ जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शिवाजीनगर न्यायालयात एकाच सत्र न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात १७० जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. एन. डी. पवार, अॅड. समीर घाडगे, अॅड. भूपेंद्र गोसावी, अॅड. रेखा करंडे आदी वकिलांनी आरोपींतर्फे बाजू मांडली.अटक आरोपींनी नेमकी तोडफोड काय केली आहे, अटक आरोपींचा नेमका काय सहभाग होता याची माहिती पोलिसांकडे नाही. त्यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. सामाजिक मागणीसाठी ते एकत्र आले होते. त्यांचा गुन्हा करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींतर्फे वकिलांनी केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी आदेश होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी बंद : आंदोलकर्त्यांच्या जामिनावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:29 AM