मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपालाही खडे बोल सुनावले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 4 वेळा पत्रव्यवहार केला, पण अद्यापही भेट मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यावर, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, अमृत महामंडळाकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याचंही ते म्हणाले.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी (MP Sambhaji Chhatrapati ) भेट होऊ शकली नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. तसेच, मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमृत महामंडळाची घोषणा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राम्हण, मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून अमृत महामंडळाची घोषणा केली. त्यानंतर त्याची सर्व फाईल पूर्ण झाली. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी याबाबत पत्रही लिहिले होते. पण कदाचित कोविडमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर दिले नसल्याचे पाटील त्यांनी यावेळी सांगितले. ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.