पुणे : मराठा आरक्षण टिकण्यात राज्य सरकारला अपयश आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले. त्यामुळे मराठा समाजाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. न्यायालयाचा निर्णय होऊन, महिना होत आला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे बीड येथे मोर्चा काढणार आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात देखील मध्यवर्ती ठिकाणी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रवक्ता तुषार काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाची माहीती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत काकडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष भरत लगड, कल्याण अडागळे, नितीन ननावरे, किशोर मुळुक, विनोद शिंदे, चेतन भालेकर उपस्थित होते.
काकडे म्हणाले, हा मोर्चा मुख मोर्चा नसून बोलका असणार आहे. सरकार विरोधात घोषणा दिल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया संख्येने नागरिक सहभागी होणार असले तरी सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचे पालन केले जाणर आहे.
पुढे ते म्हणाले की, या मोर्चाकरिता विविध संघटनेचे प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. त्याच बरोबर आता तरी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करावी. अन्यथा आंदोलनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. जरी बीडमध्ये आंदोलन होणार असले, तरी आम्ही पुण्यात प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत.