पुणे - मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार कुलकर्णी यांनी घराबाहेर यावे यासाठी आडून बसलेल्या सुमारे साठ आंदोलकांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच पोलीस ठाण्यात घेवून जात त्यांची सुटका केली. यावेळी मराठा समाजाचे आंदोलक आणि मेधा कुलकर्णी यांचे चिरंजीव यांच्यात शाब्दिक चकमक झालेली बघायला मिळाली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. त्याच विषयाला अनुसरून राज्यातील आमदार,खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. शुक्रवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या कोथरूडमधील डाहणुकर कॉलनी क्र.८ येथील नंदनवन अपार्टमेंट सोसायाटी समोर सुमारे साठ आंदोलकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच आमदार कुलकर्णी यांनी स्वत: येवून मागण्याचे निवेदन घ्यावे असा आग्रह धरला. मात्र, निदर्शने सुरू करून एक ते दीड तास होवूनही त्यांनी निवेदन घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले. यामुळे काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याचवेळी मुलाने शिवीगाळ केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.
आंदोलनादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, डेक्कन आणि अलंकार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनस्थळी पोचले. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्विकारले.यावेळी काही आंदोलकांना पोलीस व्हॅनमधून अलंकार पोलीस ठाणे येथे घेवून जात काहीवेळाने सोडून देण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतरही कुलकर्णी यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.