पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये. मराठा समाजाचं आरक्षण रद्द होण्याला अशोक चव्हाण यांच्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तितकेच जबाबदार आहेत. हे सरकार नाकर्ते आहेत, बुजगावणे आहे. आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचे असतात. पत्र लिहून आणि हाता पाया पडून आरक्षण मिळत नाही, अशा शब्दात शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच १८ मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार असून ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार असल्याचे मेटे यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर विनायक मेटे यांनी पहिल्यांदाच पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. मेटे म्हणाले, मराठा समाजात जो असंतोष आहे, तो दडपण्यासाठीच लॉकडाऊन लावला आहे.मात्र, आम्ही ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार आहोत. शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत. आमदार खासदार, मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही.
अशोक चव्हाण यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं ... १०२ घटनादुरुस्तीबाबत काही लोकांनी संभ्रम निर्माण केला होता. अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंग आणला गेला होता. तरी अशोक चव्हाण यांचे खोटं बोलणं सुरूच आहे. त्यांनी केंद्राचे आभार मानले पाहिजे, मात्र त्याऐवजी ते फक्त आरोप करायचं काम करताहेत.अशोक चव्हाण यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे अशा शब्दात मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
सर्वच जर केंद्राने करायचं मग तुम्ही काय करणार, मेटेंचा सवालमराठा आरक्षणाच्या बाबतीत ही सगळी लोकं तोंडावर पडली आहेत. यांचं तोंड काळ झालं आहे. याचिका राज्य सरकारने दाखल करण्याची आवश्यकता होती, मात्र त्यांनी फक्त टीका केली आहे.१०२ घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार काढून घेतले नाहीत सर्वच जर केंद्राने करायचं मग तुम्ही काय करणार असा सवाल मेटे यांनी यावेळी केला.
देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून राष्ट्रपतीची भेट घेणार
आम्ही लवकरच यासंदर्भात राज्यपालांना भेटणार आहोत, आणि आघाडी सरकारला तुम्ही जाब विचारावा आणि त्यांना समज द्यावी असं निवेदन आम्ही राज्यपालांची भेट घेऊन देणार आहोत. तसेच आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून राष्ट्रपतीची भेट घेणार आहोत.