पुणे - सर्वोच न्यायालयाने शिथिल केलेला अॅट्रोसिटीचा कायदा पूर्ववत करण्यासाठो केंद्र सरकारने दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (3 ऑगस्ट) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
मराठा आंदोलकांवर दाखल केले खटले मागे घेतले नाहीत तर मोठा भडका उडेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. उदयनराजे पुढे असे म्हणाले की, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. याची राज्यकर्त्यांसह विरोधक आणि राज्यातील सर्व आमदारांनी जाणीव ठेवावी. त्यासाठी वेळ काढून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आधीच 25 ते 30 वर्ष उशीर झाला आहे. लोकसभा, राज्यसभा, न्यायालय या फेऱ्यात पुन्हा 30 वर्ष उशीर नको. अन्यथा एकदा घोषणातरी करून टका की पुढची 30 वर्ष आरक्षण देत येणार नाही. काहीतरी भरीव सांगा.
उदयनराजे असंही म्हणाले की, राज्यात 54 मूक मराठा मोर्चे निघाले. त्याची जगभरातून दखल घेतली गेली. पण त्यावेळी आश्वासन दिले आणि नंतर या प्रश्नाला बगल दिली. त्याच वेळी हा प्रश योग्य पद्धतीने हाताळला गेला असता तर आज ही परिस्थिती ओढविली नसती.आरक्षणाच्या मुद्याकडे राजकारण किंवा इतर वैयक्तिक गोष्टींशी जोडू नये. आज या समाजावर वेळच अशी आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सतेवरील राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनीहो माणुसकीच्या नात्याने हे समजून घेतले पाहिजे. आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी कोणताही मार्ग राहत नाही तेव्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही.