नीरा : मराठा आरक्षणआंदोलनच्या समर्थनार्थ नीरा बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे दिवसभरासाठी बंद ठेवली आहे. परिसरातील मराठा बांधवांसह सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर सुमारे दोन तास रोखून धरला. शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच अशा घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
नीरा परिसरातील गुळुंचे कर्नलवाडी पिंपरे खुर्द राख मांडकी जेऊर निंबूत पाडेगाव आदी गावातील मराठा बांधवांंनी आरक्षणासाठी नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पुणे पंढरपूर पालखी मार्ग रोखून धरला. या मुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवार पासून येथे साखळी उपोषणा सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी कॅंडल मार्च काढण्यात आला होता. गुरवारी सकाळ पासून पंढरपूर पालखी मार्ग, लक्ष्मी रोडवरील मुख्य बाजारपेठ, नगर रोडवरील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
नीरेतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या रस्ता रोको करण्यात आला. पालखी मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्पा झाली होती. या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार महादेव जाधव यांना देण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने तलाठी सुनील पाटोळे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक बाप्पूसाहेब सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे यांसह पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.