बारामती (पुणे): २६ जानेवारी रोजी मुंबई येथील मराठाआरक्षणासाठी सुरू होणाऱ्या आमरण उपोषणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा बारामतीची तयारी करण्यात आली आहे. बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. १९) येथील जिजाऊ भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देण्यात आली. शुक्रवारी (दि.२६) आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी सुरु आहे.
बारामती तालुक्यातून एकूण एक ते दीड हजार चार चाकी वाहने निघणार आहेत. या पार्श्वभुमीवर येथील मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने संपूर्ण बारामती तालुक्यातील समाजास जाहीर आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता होणाऱ्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून निघणारी वाहने बुधवारी( दि.२४) सकाळी सात वाजता कसबा शिवाजी उद्यान येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगाव मध्ये आजूबाजूच्या गावातील समाजबांधव सकाळी आठ वाजता एकत्र जमतील. त्यानंतर सर्व समाज बांधव पुण्याच्या दिशेने देहूरोड येथे पोहोचणार आहेत.
आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे. आंदोलनासाठी येणार समाजबांधव जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.