पुणे - मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या सरकारनं त्यांच्याकडे आणि त्यांनी यांच्याकडे बोटे दाखवायची. अशी किती वर्ष टोलवाटोलवी करणार? आता एकमेकांकडे बोटे दाखवणे बंद करा. उद्या धमाका झाल्यास त्यास कोण जबाबदार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं.
उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. यावेळी ते म्हणाले की, आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. तिथे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल. मात्र ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी नसणार आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माफक अपेक्षा आहे ते जर वेळेत मिळाले असते तर लोकांना जीव द्यावे लागले नसते अशी टीकाही त्यांनी केली.
उदयनराजे भोसले यांनी मांडलेले मुद्दे
उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित
- पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका
- दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही
- उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण? टोलवाटोलवी करणारे का?
- आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा भडका उडेल!
- आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस
- ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी
- प्रत्येक लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा
- मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे
- अध्यादेश वैगरे काहीही कामाचे नाही
- मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते
- मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली
- खासदार उदयनराजे समन्वय समितीसोबत चर्चा करणार
- कायदा सुव्यवस्था हातात न घेण्याचं आवाहन
- आरक्षण न देण्यामागे इच्छाशक्ती, राजकारण कारण
- कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का नाही?
- इतकी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का ठेवला?