पुणे - मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. अशा वेळी समाजाला भडकवणारे कोणी नसेल मात्र भडका थांबवणारे पण कोणी नसेल असेही ते म्हणाले. पुण्यातील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली.ते म्हणाले की,मराठा आरक्षण आंदोलन हे या समाजाच्या वेदना आहेत. मात्र सरकारने त्यांना समजून घेणे तर लांबच पण दरोडा खून असे गुन्हे टाकले आहेत असेही ते म्हणाले.
20 ते 25 वर्ष या विषयावर राजकारण सुरू झाले आहे.आरक्षण देण्यासाठी विरोध कोणाचाच नाही, मग आरक्षण का नाही असा सवालही त्यांनी विचारला.त्यासाठी केवळ ईच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारण आड आल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं. मागील अनेक वर्ष टोलवाटोलवीत गेली, जर धमाका झाला तर कोण जबाबदार असेही ते म्हणाले.