मुंबई: क्रांती दिनानिमित्त करण्यात आलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. बाहेरच्या शक्ती घुसल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोपदेखील मराठा क्रांती मोर्चा समितीनं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पुण्यात काल झालेल्या हिंसक आंदोलनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती समाजाच्या वतीनं पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये, असा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे पुढील आंदोलन संख्येचं नव्हे, तर शांततेचं आणि संयमाचं असेल, असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं. यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नसल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या निरपराध कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही, तर आत्मक्लेश आणि चूलबंद आंदोलन करू आणि त्यानंतर तालुका-जिल्हा स्तरावर साखळी पद्धतीनं चक्रीउपोषण करू, असा इशारादेखील यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला.
Maratha Reservation: यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 4:51 PM