पुणे : एकीकडे गरिबीतला समाज, दुसरीकडे मूठभर श्रीमंती, शेतीच्या समस्या याचीच परिणीती मोर्च्याच्या माध्यमातून बघायला मिळाले.हा जरी मूक मोर्चा होता तरी त्याचा आवाज हजारोपटीने मोठा होता.त्याची दखल सरकारला घ्यावी लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंपदामंत्री विजय शिवतरे,डॉ सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या माध्यमातून परकीय आक्रमण झाल्यावर देव, देश आणि धर्माला सुरक्षित ठरवण्याचे काम केले.पूर्वी या समाजात सामाजिक आर्थिक मागासलेपण होते. मूठभर हिस्सा बलवान झाला, मात्र बृहत हिस्सा गरिबीत लीन झाला.शाहू महाराजांनी समाज पुढे जाण्यासाठी चळवळ उभी केली.सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातून न्यायालयात अहवाल देऊन योग्य तो निर्णय होवून आरक्षण मिळेल अशी मला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.अमेरिकेला स्टेचू ऑफ लिबर्टीच्या माध्यमातून ओळखलं जातं त्याप्रमाणे भारताला अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून ओळखले जाईल.
संभाजीराजे म्हणाले की, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सरकारची योजना आहे.आरक्षण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळणारच पण त्यासोबत सरकारने सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास करावा अशी विनंती केली.महसूलमंत्री पाटील म्हणाले की,शाहू महाराजांच्या काळात कोणी आरक्षणासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी मोर्चे काढले नाही,ते त्यांना समजत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रजेला हव्यात त्या देण्याचे ठरवले आहे.मोरे म्हणाले की, मराठा समाजाची सर्व स्तरातून प्रगती व्हायला हवी असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे सांगतात.