वरवंड : मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला असून पुरावे असताना जाणूनबुजून लपवण्यात येत होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांची वरवंड येथील बाजार मैदानात विराट सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोरगरीब मराठ्यांचे मुडदे पाडून सत्तर वर्षे सरकारने पाळलेले बागलबच्चे समिती नेमतात, आयोग बनवले; पण मराठ्यांची नोंद सापडली नाही. ओबीसीमध्ये असतानाही आमच्या मराठ्यांचे पुरावे शोधले नाही. आता समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. १८०५ पासून न्यायमूर्तींनी २०२३ पर्यंतचे पुरावे आजरोजी सापडले आहेत. या सरकारने ७० वर्षे पुरावे लपून ठेवले होते, आज कसे सापडले? मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असताना घात केला. यांनी ठरवून षडयंत्र केले आहे. मराठ्यांच्या विराट शक्तीपुढे सरकार जागे झाले. या एकीपुढे सरकारने नमते घ्यावे लागले. मराठ्यांचा २४ डिसेंबरला विजय होणार आहे. आता मागे नाही हटणार. आपण ७० टक्के लढा जिंकला आहे. जर या राजकीय मंडळींनी चाळीस वर्षे साथ दिली असती तर आज आरक्षण मिळाले असते. जे राजकीय लोक आपले नाहीत, आपण त्यांना मोठे केले आहे. या नेत्यांचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल, या आशेने आपण त्यांना निवडून दिले. आजचे नेते आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलू लागले आहेत. जे आपल्या मदतीला येणार त्यांना आपण मदत करणार आहोत. विजयाचा दिवस जवळ आलेला आहे. मतभेद होऊन देऊ नका, आपल्या लेकरांचे वाटोळे होऊन देऊ नका. राजकारणांना जवळ करू नका. १ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा. शांततेत आंदोलन करा.