पुणे : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (दि.६) करण्यात आली. डॉ. सुरेश सावंत, प्रा. विश्वास वसेकर, ज्योतिराम कदम, डॉ. वैशाली देशमुख आदी साहित्यिकांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सदाशिव पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रसार समिती (हिंदी भवन) येथे ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे व किरण केंद्रे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी दिली.
बालकथा विभागात 'रंजक गोष्टी छोट्यांसाठी' या पुस्तकासाठी प्रा. प्रकाश करमरकर (दापोली) आणि 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले' पुस्तकासाठी रमाकांत देशपांडे (नाशिक) यांना विभागून जाहीर झाला आहे. कवितासंग्रह विभागात 'नदी रुसली-नदी हसली' पुस्तकासाठी डॉ. सुरेश सावंत (नांदेड) आणि 'आईचा हात' - अ. म. पठाण (औरंगाबाद) यांना विभागून पुरस्कार दिला जाणार आहे. बालकादंबरी विभागात
'वारुळ' पुस्तकासाठी संजय ऐलवाड (उदगीर) आणि 'माणिक झाला राष्ट्रसंत' पुस्तकासाठी बबन शिंदे (हिंगोली) यांना विभागून पुरस्कार देण्यात येणार आहे. एकांकिका विभागात ' न्याय व खरा धर्म' पुस्तकासाठी ज्योतिराम कदम (पुणे) आणि 'नवी प्रतिज्ञा' पुस्तकासाठी सुनंदा गोरे (औरंगाबाद) यांना विभागून पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच, विज्ञान पुस्तकांसाठीच्या विभागात 'आभाळाचे गुपित' देवबा पाटील (खामगाव) यांना तर समीक्षा विभागात 'बालसाहित्याचे अंतरंग' पुस्तकासाठी प्रा. विश्वास वसेकर (पुणे) आणि 'वाटा आणि वळणे' पुस्तकासाठी प्रा. रामदास केदार (उदगीर) यांना गौरविण्यात येणार आहे. शैक्षणिक विभागात 'टिन एज डॉट.कॉम' पुस्तकासाठी डॉ. वैशाली देशमुख (पुणे), चरित्रात्मक विभागात 'संपादित मुलांसाठी कविता' वीरभद्र मिरेवाड (नांदेड) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
मुलांचे साहित्य या विभागात 'हिरवळ' या पुस्तकासाठी स्नेहल डांगे (सोलापूर) आणि काव्यबन या पुस्तकासाठी गायत्री सूर्यवंशी (लातूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. परीक्षक म्हणून कविता मेहेंदळे व निर्मला सारडा यांनी काम पाहिले.