पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळत नसल्याने विभागावर हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, शासकीय पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असल्याने अमराठी भाषिक अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेविषयी मार्गदर्शनपर वर्ग घेण्याचा प्रयत्न मराठी विभागातर्फे केला जाणार आहे.
विद्यापीठाच्या मराठी विभागाने काही वर्षांपासून ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’, पटकथालेखन, प्रशासकीय मराठी आदी पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यातील अमराठी भाषिकांसाठी मराठी या अभ्यासक्रमासाठी पहिले दोन वर्षे प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर केवळ ७ विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासाठी प्रतिसाद मिळाला. तर मागील वर्षी केवळ दोन विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. परंतु, दहापेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच हा अभ्यासक्रम सुरू ठेवता येईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे मराठी विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे सध्या एकही अमराठी विद्यार्थी विद्यापीठातून मराठी भाषेचे धडे गिरवत नसल्याचे समोर आले आहे.अमराठी भाषिकांसाठी मराठी या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यापीठातर्फे दरवर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. परंतु, विद्यार्थ्यांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनातील विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या अमराठी भाषिक अभ्यासक्रमाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. शासनाच्या कोणत्याही कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिल्यास विभागामार्फत तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.शासनाच्या मराठीविषयक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध विभागांत प्रशासकीय मराठीचा वापर झाला पाहिजे. त्यामुळे मराठी विभागातर्फे ‘प्रशासकीय मराठी’ हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याचेही मार्गदर्शन विद्यापीठातील व शासनाच्या इतर प्रशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने आवश्यक निर्देश देणे गरजेचे आहे, असेही डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या अभ्यासक्रमास सध्या विद्यार्थी नाहीत. परंतु, या अभ्यासक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी विभागातर्फे प्रयत्न केले जातील. तसेच विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास विभागाकडून पुन्हा मार्गदर्शनपर वर्ग सुरू केले जातील.- डॉ. तुकाराम रोंगटे, मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ