पुणे : मराठीसिनेमांना चित्रपटगृह मिळत नाहीत, अशी ओरड होते. त्यावर उपाय म्हणून आता ‘द बॉक्स’ या प्रायोगिक नाट्यगृहामध्ये चित्रपटाचे खेळ सुरू केले आहेत. चार दिवस रोज दोन खेळ झाले, त्यामुळे नाट्यगृहात आता चित्रपट दाखवता येईल, या नव्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात अनेक नाट्यगृहे आहेत, त्या ठिकाणी देखील असा प्रयोग करायला हरकत नाही. याविषयावर ‘लोकमत’ने यापूर्वी देखील वृत्त प्रसिध्द केले होते.
चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याने अनेक मराठी सिनेमांना चित्रपटगृहांमध्ये शो करायला वेळा मिळत नाहीत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यावर एक चांगला उपाय निघाला असून, पुण्यातील ‘द बॉक्स’ या प्रायोगिक नाट्यगृहात ‘या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटाचे खेळ सुरू करण्यात आले. या प्रयोगामुळे मराठी चित्रपटांना प्रदर्शनाची नवीन जागा मिळाली आहे. कारण बऱ्याच मराठी सिनेमांचे आर्थिक गणित कमी असते. त्यामुळे त्यांना चित्रपटगृहात स्थान मिळत नाही.
काही कलात्मक आणि वेगळ्या विषयांवरचे सिनेमे असतात. त्यांच्यासाठी चित्रपटगृहात प्रदर्शन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर चित्रपटगृहचालक तो सिनेमा लगेच काढतात. त्या ठिकाणी दुसरा सिनेमा लावतात. बऱ्याचदा चित्रपटाचे खेळ रद्द करावे लागतात. या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी नाट्यगृहांमध्ये परवानगी द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली होती.
दरम्यान, या विषयावर रंगकर्मी प्रदीप वैद्य यांनी त्यांच्या ‘द बॉक्स’ या प्रायोगिक नाट्यगृह संकुलातील ‘बॉक्स टू’ या नाट्यगृहात सिनेमा दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दोन खेळ झाले. नाट्यगृहामध्ये काही कार्यक्रम नसेल तर ते मोकळे राहते. त्यामुळे त्या ठिकाणी चित्रपट दाखवणे शक्य होऊ शकते. म्हणून ‘द बॉक्स’चे प्रदीप वैद्य यांनी हा प्रयोग राबवला आहे. त्यांच्याकडे शेवटचे दोन खेळ तर हाऊसफुल्ल झाले.
भविष्यात मिळू शकते नवी वाट
‘या गोष्टीला नावच नाही’ या मराठी चित्रपटापासून त्याची सुरुवात झाली आहे. हा चित्रपट ‘द बॉक्स’मध्ये दाखविण्यात येत आहे. नाट्यगृहात चित्रपट दाखवल्यामुळे चित्रपटाला हक्काची जागा, हक्काची वेळ मिळू शकेल. या प्रयोगातून भविष्यात मराठी चित्रपटांसाठी नवी वाट निर्माण होऊ शकेल, असे प्रदीप वैद्य यांनी सांगितले.
‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या सिनेमाचे खेळ पुन्हा ‘द बॉक्स’मध्ये २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान दररोज दोन खेळ पाहता येतील. काही चित्रपटांना त्यांची ताकद दाखविण्यासाठी असा प्रयोग करता येईल. म्हणून आम्ही आमचा रंगमंच उपलब्ध करून दिला. - प्रदीप वैद्य, द बॉक्स थिएटर