पिरंगुट : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शाखांमध्ये मराठी दिन व विज्ञान दिन ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा प्रारंभ हा पेरिविंकल स्कूलच्या बावधन शाखेमध्ये विज्ञान यज्ञ प्रज्वलित करून करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विज्ञानगीताने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एनसीएलमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. रोडे, शिक्षक तज्ञ मार्गदर्शक दिलीप देशमुख ,माजी प्रसिद्ध सिने अभिनेते निळू फुले यांचे जावई व एफ.एम.सी.जी.डीलर असोसिएशन पुणे जिल्हाचे अध्यक्ष प्रसन्न जोशी तसेच निळू फुले यांचे पुतणे बिपीन फुले व मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव यांच्या समवेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संस्थेच्या संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख रुचिरा खानविलकर, निर्मल पंडित सह आदी मान्यवर उपस्थित होते. तर पेरिविंकल स्कूलच्या सर्व शाखांमधील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थीवर्ग आणि शिक्षकवृंद यांनी ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंगवर या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगून सी.अल्ड्रीन व नील आर्ममस्ट्रॉंग यांच्यावर आधारित अनेकांना माहीत नसलेली सत्यकथा सांगून जीवनात एक सेकंद कसा महत्वाचा असतो हे सांगत विज्ञान दिनाचे महत्व पटवून दिले.तर संचालिका रेखा बांदल यांनी मराठी दिनावर उत्स्फूर्तपणे 'मराठी भाषेची श्रीमंती' ही कविता सादर केली.
याचबरोबर दिलीप देशमुख यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊन वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनातील आठवणी सांगत विज्ञानामुळे जग कसं पुढे गेलंय व संशोधन करणारे अधिकाधिक हे भारतातलेच आहेत असे सांगितले.
तर डॉ. सी. व्ही. रोडे यांनी एक शास्त्रज्ञ कसा घडतो हे सांगत आपल्या देशाला अशा अनेक शास्त्रज्ञांची ची साथ कशी लाभते याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे नियोजन हे मुख्याध्यपिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली कला शिक्षिका नीता पवार व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने व मदतीने अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
पेरिविंकल स्कूलमध्ये मराठी दिन व विज्ञान दिन साजरा करतेसमयी उपस्थित असलेले मान्यवर.