पुणे : माध्यमातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. हे चित्र असताना देखील ज्ञानात भर घालणा-या विविध पुस्तकांचे, ग्रंथांचे प्रकाशन सोहळे सातत्याने होत आहेत. तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून मान्यवर लेखकांची दखलच घेतली जात नाही. परिणामी भाषेचे ज्ञान न मिळाल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होत नसल्याची खंत मसापचे माजी अध्यक्ष डॉ.प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे ' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेजवलकर बोलत होते. या कार्यक्रमाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रणती टिळक, प्राचार्य डॉ. संजय कंदलगावकर, डॉ. हेमंत अभ्यंकर, साकेत प्रकाशनच्या प्रतिभा भांड आदी उपस्थित होते. दरम्यान, व्यवस्थापन विभागातर्फे अनेक स्पर्धा घेण्यात आल्या असून,विजेत्यांना गौरविण्यात आले. शेजवलकर म्हणाले, डॉ. राशिंगकर याचे अनेक ग्रंथ, पुस्तके वाचनीय आहेत. परंतु, त्यांसारखे अनेक लेखक चांगल्याप्रकारे साहित्य क्षेत्रात आपले योगदान देत आहे. परंतु, मसापसारख्या संस्थेकडून त्यांची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नाही असा आरोपही शेजवलकर यांनी केला. वॉरन बफे या व्यक्तीने वयाच्या १२ व्या वर्षी रिकाम्या बाटल्या विकून पैसा कमावला. परंतु, त्या पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे हे त्यांनी तेव्हाच जाणले म्हणून त्यांची जगातले तिसरे श्रीमंत अशी ख्याती मिळवली. मात्र, एवढा पैसा कमावून अखेरच्या श्वासाला सर्व संपत्ती आपले स्वत:च्या नावे जाहीर न करता समाजासाठी दान केली. असा उदारमतवादीपणा देखील त्यांच्या अंगी असून तरुणांनी त्यांची तत्व आचरणात आणावीत असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. टिळक यांनी सांगितले, ज्ञान देणारी पुस्तके तरुणांना सहज उपलब्ध होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तरुणांनी अशा पुस्तकांसोबत सहवास वाढवून जीवनात वेळोवेळी त्याचा फायदा घेतला पाहिजे.-------------आपलेच दात आपलेच ओठ मी जेव्हा मसापच्या अध्यक्षपदी होतो तेव्हा अनेक गोष्टी घडल्या, पाहिल्या पण काय करायचे आणि काय करायचे नाही या पथ्यानुसारच कार्य केली. पण सध्या मसापची अवस्था पाहता आपलेच दात आणि आपलेच ओठ असे म्हणत डॉ. प्र.चिं शेजवलकर यांनी मसापच्या पदाधिका-यांना टोला लगावला.
भाषेच्या अज्ञानामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही : डॉ. प्र.चिं शेजवलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 7:02 PM
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग आणि साकेत पुस्तक प्रकाशन व डॉ. सुधीर राशिंगकर लिखित 'गुंतवणूक सम्राट वॉरन बफे' पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी कै. इंदुताई टिळक सभागृहामध्ये उत्साहात पार पडला.
ठळक मुद्देचांगल्या प्रकारे साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांची मसाप कडून दखल नाही