पुणे : चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे असले तरी घर विकून त्यांच्या कार्याला हातभार लावणा-या त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांचाही त्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवरच त्यांच्या नावाने मराठी चित्रपट संग्रहालय उभारण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी केली.राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ५२ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे,सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. तावडे यांनी दुर्मिळ मराठी चित्रपट,कथा,पटकथा, साहित्य असा चित्रपटांशी संबंधितअनमोल ठेवा जतन होण्याच्या दृष्टीने अशाप्रकारचे संग्रहालय निर्मित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सूर्यकांत लवांदे यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सिनेसंग्राहक नारायण फडके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार
By admin | Published: May 02, 2015 5:34 AM