- प्रीती जाधव-ओझा ।लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या राज्यात इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळा बंद होत असताना आॅस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळा रूजत आहे. तिथे मराठी भाषा शिकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत.
मातृभाषेशी नाळ तुटू नये म्हणून मेलबर्नमध्ये प्रसाद पाटील यांनी मित्र मंडळींच्या सहकार्याने मराठी शाळा सुरू केली आहे.प्रसाद पाटील हे मूळचे जळगावचे पण वडील शिक्षक असल्याकारणाने त्यांचे शिक्षण मराठी माध्यममधून रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेऊन नोकरीनिमित्त मेलबर्न येथे २००९ सालापासून स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी स्थायिक झाल्याने त्यांचा मुलगा आदित्य याने आॅस्ट्रेलियन संस्कृती जुळवून घेतली आहे. यामुळे प्रसाद पाटील यांना आपला मुलगा आपली संस्कृती विसरून आॅस्ट्रेलियन संस्कृतीशी एकरूप होतो का? अशी शंका भेडसावत होती.एकदा टीव्हीवरील मराठी कार्यक्रम पाहताना मुलांने विचारले हे काय पाहताय. चॅनेल बदला व इंग्रजी भाषेतील कार्यक्रम लावा अशी सूचना केली. यामुळे आपल्या मुलाला मातृभाषाच माहिती नाही, याची खंत वाटू लागली.मुलांने आॅस्ट्रेलियन संस्कृतीबरोबर मराठी संस्कृती टिकवून ठेवावी, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रसाद पाटील यांनी आपल्या घरचे वातावरण नेहमी मराठमोळे ठेवले आहे.
पण आपल्या मुलाला मराठी लिहिता वाचतादेखील आले पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत होते. याबाबत त्यांनी आपली पत्नी हेमलता यांच्याशी चर्चा केली, व केवळ आपल्या मुलाला मराठी शिकविण्याऐवजी आपल्या मित्रमंडळींच्या मुलांनादेखील मराठी संस्कृती अवगत व्हायला हवे, याकरीता त्यांनी याबाबत आपल्या मित्रमंडळींशी चर्चा केली. यातून त्यांना मराठी शाळा सुरू करण्याची कल्पना सुचली.४सप्टेंबर २०१५ मध्ये मेलबर्न (डॅन्डेनॉगॅ) येथील सभागृहात संकल्प एक निश्चय या मराठी शाळेचा श्रीगणेशा झाला. या शाळेत येणारी मुले ही नियमित पणे सोमवार ते शुक्रवार नेहमीच्या इंग्रजी शाळेत जातात पण दर शनिवारी दुपारी मराठी शाळेत येऊ लागली. पहिल्या वर्षी ५ ते १३ वयोगटातील ४० विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला. प्रारंभी शाळेच्या खर्चाकरिता अभिनेता सुबोध भावे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
४त्या कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीमधून एक वर्ष या शाळेचा खर्च चालला. त्यानंतर पुन्हा निधीचा प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर काही पालकांनी एकत्रित येऊन हा खर्च उचलण्याचे ठरविले.४सध्या या शाळेत शिशु वर्ग व मोठा वर्ग असे दोन वर्ग सुरू असुन ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येते त्यांना मोठ्या वर्गात प्रवेश दिण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांनी नूतन प्रवेश घेतला आहे त्यांना शिशु वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.