पुणे : मराठी ही दैनंदिन व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी राज्य सरकारने मराठी भाषा विकास प्राधिकरणाचा कायदा करावा, तत्त्वतः मान्यता मिळालेले मराठी विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षी सुरू करावे, अशी मागणी करण्याचा ठराव ‘मराठीच्या भल्यासाठी’ या २४ मराठी संस्थेच्या शिखर संस्थेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ई-मराठी, मराठी विद्यापीठाचे स्वरूप व उपक्रम ठरविणे, विज्ञान तंत्रज्ञानाचे शिक्षण मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय अनुवाद अभियान सुरू करणे, यासाठी अभ्यासगटांची स्थापना करण्यात आली.
‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बुधवारी पार पडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समितीचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्ष म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. मधु मंगेश कर्णिक यांनी ३० वर्षांनी मसापला भेट दिल्याबद्दल प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाशी मराठीच्या विकासासाठी संवाद साधत राहणार आहे. मराठीशी संबंधित विषयांचा अभ्यास करून, त्यांची आवश्यकता अहवालाद्वारे मांडणे व पाठपुरावा करणे हे समितीचे धोरण आहे, पण प्रसंगी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन व संघर्ष करण्याची तयारी ठेवली आहे. समितीने मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी एक रोडमॅप तयार केला आहे, असे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी जाहीर केले.
----
बैठकीतील ठराव :
१) शालेय विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती विकसित होऊन ते बहुश्रुत व विवेकी वाचक व नागरिक व्हावेत, म्हणून कार्याध्यक्षांनी तयार केलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली व तो संमत करून शासन निर्णय जारी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागास पाठविण्याचा ठराव संमत करण्यात आला.
२) मराठी शाळांची गुणवत्ता वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याशिवाय ग्रामीण व बहुजन विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण मिळणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले. याबाबतच्या तयार केलेल्या प्रारूपास मंजुरी देऊन तो शासनास पाठवावा, असे ठरविण्यात आले.
३) ‘मराठीच्या भल्यासाठी’ समिती केवळ शासनास मागणी करत नाही, तर स्वतःही आपल्या स्तरावर काम करते. या बैठकीत शासनाला अहवाल सादर करण्यासाठी पुढील अभ्यासगट नियुक्त करण्यात आले.
-------
हिंदी विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन झाले. कारण इथे हिंदी सहज स्वीकारले जाईल, हे सरकारला माहीत आहे. मात्र, मराठी विद्यापीठाबाबत एवढी तत्परता दाखविण्यात आली नाही. मराठी भाषेला प्रतिष्ठा कधी मिळणार, याचा विचार आपण कधी करणार?
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष.
-------