पुणे : मराठी भाषा सुधार मोहिमेअंतर्गत मराठी प्रमाणलेखन पुस्तिका तयार करणे, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या, घराची किंवा रस्त्यांची नावे वृत्तपत्रातील, दूरचित्रवाणीवरील जाहिराती या ठिकाणी होणारे अशुद्ध लेखन सुधारण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणे, मराठी पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेखाली लेखकाचे नाव छापण्यासाठी बालभारती, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, दिल्ली यांना पत्र देऊन पाठपुरावा करणे, शुद्ध मराठी लेखन कार्यशाळा घेणे, प्रज्ञावंतांच्या मुलाखतीचा साहित्य-कला संवाद उपक्रम घेणे इ. क्रियाशील उपक्रम अक्षरभारती संस्थेतर्फे हाती घेण्यात येणार आहेत.
सध्याच्या काळात अशुद्ध मराठी लेखनाचे प्रमाण वाढले आहे. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. याचे विचारमंथन करण्यासाठी सदाशिव पेठ येथील रमेश बेंद्रे ब्लॉक्स येथे अक्षरभारतीच्या नवनिर्वाचित
कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले, प्रा.डॉ. अविनाश सांगोलेकर, रमेश बेंद्रे, प्रा. धनंजय भिसे, कवयित्री रूपाली अवचरे, संस्थेचे पिंपरी
चिंचवड विभाग प्रमुख सुरेश कंक यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हे सर्व क्रियाशील उपक्रम दि. १ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत करण्यात येतील, असे संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत सर्व कार्यक्रम ऑनलाईन
पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला असल्याचेही ते म्हणाले.
------------------------------------------------------------------