पिंपरी : प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.त्रिवेणीनगर येथील नटराज कला-क्रीडा प्रतिष्ठानच्या १४व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ जणांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी देखणे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, अभिनेते विजय कदम, विजय पटवर्धन, नाट्यनिर्माते विजय जोशी, नगरसेवक बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.या वेळी आत्माराम जाधव (देहूगाव), डॉ. श्रीहरी डांगे (तळेगाव), प्रवीण नेवाळे (चिखली), योगेश फापाळे (आळे फाटा), राजू खंडागळे (चिंचवड), सुनील भटेवरा (कामशेत), पांडुरंग पाटील, संदीप जाधव, उदय कवी, मधुसूदन ओझा, मुकुंदराज ढिले, मंगला पाटील, ऐश्वर्या जोशी, ह.भ.प. स्मिता हरकळ यांना आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.बारणे म्हणाले, ‘‘सत्कर्म करणाऱ्यांचा सत्कार होतो. पुरस्कारप्राप्त व्यक्तीमुळे त्या पुरस्काराची उंची वाढते. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. आपल्या बांधवांना मदत करणे हे आपलेच कर्तव्य आहे. सर्वच काम शासनाने करावे, याची वाट पाहू नका. दुष्काळग्रस्तांना एक माणुसकी म्हणून मदत करा.’’ विजय कदम म्हणाले, ‘‘येत्या दिवाळीमध्ये फटाके न वाजवता दुष्काळग्रतांना आर्थिक मदत करून दुष्काळग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करा.’’ अध्यक्ष महेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कोरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विकेश मुथ्था यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत
By admin | Published: October 05, 2015 1:36 AM