पुणे: जगभरातील रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहत असतात. मागील दोन वर्षापासून तो कोविडमुळे झाला नाही. परंतु आता दोन वर्षानंतर कोविडची भीती कमी झाली आहे. जनजीवन देखील सुरु झाले. साहित्य संमेलन देखील नाशिकला मोठ्या उत्साहात पार पडले. परंतु सवाई गंधर्वला (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) मात्र उपस्थितीला 25% परवानगी हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सवाईगंधर्व 50% उपस्थित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या या मागणीसाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस आयुक्त आमच्या मागणीवर सकारात्मक होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महानगरपालिका आणि सरकारशी देखील या विषयावर बोलणार आहोत. सवाई गंधर्वच्या संयोजकांनी आता थांबू नये असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. ते म्हणाले, नियम रोजच बदलत असतात. त्यामुळे 50 टक्के परवानगीसाठी अर्ज करून तुम्ही तयारीला लागा. काहीही करून या वर्षी सवाई गंधर्व होणार असल्याचा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मागील सात दशकांपासून पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हा महोत्सव रद्द झाला होता. यावर्षीदेखील कोरोनाचा संकट टळलं नसल्यामुळे खुल्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 25% उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.