Raj Thackeray: पुण्यात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय मराठी विश्व साहित्य संमेलनात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून मराठी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा शेवट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं. त्यासह विकासाच्या नावाखाली जमिनींच्या विक्रीवरुन राज ठाकरे यांनी भाष्य केलं.
"कलाकारांना पुरस्कार मिळतात, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो तिरस्कार घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्यानंतरच तुम्हाला दाद देतात. बाकीची राज्ये स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलायला जातो. आपल्याकडची मुलं मुली एकमेकांना भेटल्यावर हिंदीमध्ये बोलतात कशासाठी. या हिंद प्रातांवर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलं आहे. मराठी भाषेसाठी उदय सामंत यांनी जी लागेल ती मदत करु असं सांगितले आहे. पण जी गोष्ट आम्ही करू त्यात तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तेव्हा फक्ते केसेस टाकू नका," असं राज ठाकरे म्हणाले.
"मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय. मराठी माणसांचं जे अस्तित्व आपल्या शहरांमध्ये असायला हवं आणि दिसायला हवं त्यासाठी राज्य सरकारने आणि आपण सगळ्यांनी मिळून ते टिकवले पाहिजे. प्रगतीच्या नावावरती नुसत्या जमिनी जाणार असतील आणि आमचीच लोकं बेघर होणार असतील त्याला विकास असं म्हणत नाही. आपलं अस्तित्व पुसण्याचा एक प्रकारचा तो डाव असतो. कलम ३७० काश्मीर मधून रद्द झालं. त्याचा अर्थ काय तर भारतीय माणूस तिथे स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जणांनी जमीन घेतली मला माहिती नाही. खरंतर पहिल्यांदा अदानी आणि अंबानी यांनी घेतली पाहिजे. त्यानंतरच लोकांना विश्वास बसेल की तिथे जायला हरकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
"हे फक्त काश्मीर पुरतं मर्यादित नाही. तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथे तुम्ही जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही आसाम, मणिपूर यासारख्या भागात गेलात तर जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा. मग आम्हीच काही मोकळी दिली आहे. तुम्ही या आणि आमची जमीन घेऊन जा. हा जो प्रकार आहे यामुळे तुमचं अस्तित्व टिकलं नाही मग भाषा कुठून टिकेल. तुम्ही असाल तरच भाषा टिकेल. मराठी माणसाबरोबर मराठी माणसाचं अस्तित्व देखील राज्य सरकारने टिकवलं पाहिजे," असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं.