प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : एका ज्येष्ठ साहित्यिकाची संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड केल्यावर निवड न झालेल्या साहित्यिकांचा अपमान होईल, असे कारण पुढे करत मराठवाडा साहित्य परिषदेने आम्ही पाठवलेली नावे माघारी घेत असल्याचे पत्र महामंडळाला पाठवले खरे; प्रत्यक्षात, मराठवाड्यातील दोन नामवंत साहित्यिकांनीच परिषदेला आपली नावे मागे घेण्याचे सूचना केल्याचे वास्तव समोर आले आहे. एका साहित्यिकाने पूर्वसंमती न घेतल्याचे कारण देत, तर दुस-या साहित्यिकाने आपल्याला अध्यक्षपदच नको असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेसमोर पेच निर्माण झाला असून त्यावरचा उपाय म्हणून नावे मागे घेतल्याची कुजबूज साहित्यविश्वात आहे.घटक संस्थांनी तीन, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांनी प्रत्येकी एक अशी नावे महामंडळाकडे पाठवल्यावर २८ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. मराठवाड्यातून नरेंद्र चपळगावकर, सुधीर रसाळ, रा. रं.बोºहाडे, ना. धो.महानोर या ज्येष्ठ साहित्यिकांची नावे सुरुवातीपासून चर्चेत आहेत.
साहित्यिकांनीच नकार दिल्याने मराठवाडा साहित्य परिषद पेचात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:25 AM