पुणे : राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला तब्बल साडेआठ लाख रुपयांचा निधी वर्ग करून पुढील सात दिवसांत कोविड जनजागृती करून खर्च करा, असे आदेश दिले आहेत. दर वर्षी मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अखेरच्या काही दिवसांत अखर्चीत राहिलेला लाखो- कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विभागांना पाठवून खर्च करण्यास सांगितले जाते. यामुळे अनेक वेळा शासनाचा लाखो रुपयांचा निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत असल्याची अनेक उदाहरण समोर येतात.
मार्च एण्ड आल्यावर शासनाकडून शेवटच्या काही दिवसांत, काही तासांमध्ये अचानक लाखो रुपयांचा निधी एखाद्या विभागाला पाठवला जातो आणि चार दिवसांत, आठ दिवसांत निधी खर्ची टाकून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले जातात. असाच एक अजब-गजब फतवा शासनाने काढला असून, दोन दिवसांपूर्वी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला साठेआठ लाखांचा निधी वर्ग केला असून, कोविड जनजागृतीवर खर्च करण्यास सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड कमी झाली असून, कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत शासनाने कोविड जनजागृतीवर खर्च करण्यासाठी आठे आठ लाख रुपयाचा निधी पुणे जिल्ह्यासाठी दिला आहे. हा निधी कोणत्या विभागा मार्फत खर्च करायचा, कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना काय व कुणासमोर जनजागृती करणार असे अनेक प्रश्न सध्या संबंधित विभागासमोर उभे राहिले आहेत. हीच परिस्थितीत इतर विभागामध्ये देखील असते. शासनाकडून आलेला लाखो, कोट्यावधी रुपयांचा निधी सात- आठ दिवसांत कसे खर्च करणार असा प्रश्न निर्माण होतो.