पुणे : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळून राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बाजीराव राेडवरील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून या माेर्चाला सुरुवात झाली. विभागीय आयुक्त कार्यालयासमाेर या माेर्चाची समाप्ती झाली. या महामोर्चात सहभागी समाजबांधवांनी आणि धर्मगुरुंनी एकत्रीतरीत्या लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी वज्रनिर्धार व्यक्त केला. अधिकाऱ्यांना लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता मिळून अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
या महामोर्चात लिंगायत समाजाच्या 50 धर्मगुरुंसह पुणे शहर आणि जिल्हा परिसरातून तसेच संपूर्ण राज्यातून आणि कर्नाटक, तेलंगणामधून लाखो लिगांयत बांधव सहभागी झाले होते.
कर्नाटक सरकाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने लिंगायत धर्माला त्वरीत मान्यता देऊन त्याविषयी केंद्रसरकारला शिफारस पाठवावी, लिंगायतांना अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा, 2021 मध्ये होणा-या भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र्य नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरुपात नोंदीची व्यवस्था करावी, लिगांयत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादीत करण्यासाठी शासनाने स्वतंत्र मंडळाची किंवा प्रकल्पाची निर्मिती करावी, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे, अशा मागण्या या महामोर्चाद्वारे करण्यात आल्या.