जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक असा मर्दानी दसरा शनिवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल १५ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.नवरात्राची सांगता व घराघरांतील घट उठल्यानंतर, शनिवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडाºयाच्या उधळणीत खांदेकरी मानकºयांनी देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी उचलली. भंडाºयाच्या उधळणीत देवाच्या जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली. भंडारगृहातून देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकºयांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. या वेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी मुक्तहस्ताने भंडाºयाची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ८ च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, आबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंडभैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघनासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्यामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्हीकडील विश्वस्त मंडळाकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील विद्युत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मर्दानी अनुभूती देत होता. यातच उत्सवमूर्तींच्या पालख्यासमोर होणाºया विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते.
१५ तास रंगला मर्दानी दसरा, सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:33 AM