पुणे : कोलकत्यामध्ये एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी शुक्रवारी संपाचे शस्त्र उगारले.सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तातडीची वैद्यकीय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद ठेवण्यात आल्या. कोलकत्यामधील एन आर एस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.परिबाहा मुखर्जी व यश टेकवानी या कार्यरत ज्युनिअर डॉक्टरांवर रूग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला चढवला. सध्या ते मृत्यूशी झगडत आहेत. कोलकात्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात उमटले आहेत. या मारहारणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला. सकाळी साडेदहा वाजता बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात जमून मार्डच्या डॉक्टरांनी कोलकत्याच्या घटनेचा निषेधही केला. यासंदर्भात ‘लोकमत’ शी बोलताना बीजे मार्डचे सचिव डॉ. अभिषेक जैन म्हणाले, निवासी डॉक्टर हे 16 ते 24 तास रूग्णसेवेचे काम करतात. तरीही आम्ही हे का सहन करायचं? सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा मंजूर करावा आणि डॉक्टर व रूग्णालयाला चोवीस तास सुरक्षा द्यावी तरच अशा गोष्टींना वचक बसेल. इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या देशव्यापी निषेध दिनानिमित्त आय. एम. ए. पुणे शाखेच्या सर्व सभासदांनी काळ्या फिती लावून कलकत्ता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आय. एम. ए. च्या मेडिकल स्टुडंट नेटवर्कने मार्ड सोबत जोरदार निदर्शने केली. आय. एम. ए. च्या पदाधिका-यांनी व सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केले व नंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन दिले. याप्रसंगी आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. संजय पाटील, ट्रस्ट बोर्ड चेअरमन डॉ. अविनाश भुतकर ,डॉ. पद्मा अय्यर, डॉ. आरती निमकर, डॉ. बी. एल. देशमुख, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. राजू वरयानी, डॉ. राजन संचेती व डॉ. आशुतोष जपे उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोलकत्यातील ज्युनिअर डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मार्डचा एकदिवसीय संप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 8:43 PM
डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी शुक्रवारी संपाचे शस्त्र उगारले.
ठळक मुद्देकोलकत्यामध्ये एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणआय. एम. ए. पुणे शाखेच्या सर्व सभासदांनी काळ्या फिती लावून निषेध