पुणे : दसऱ्याला सोन्यासारखे झेंडूच्या फुलांना महत्त्व दिले जाते. गतवर्षी झेंडूचे उत्पादन कमी असल्याने चांगलाच ‘भाव’ मिळाला होता; परंतु यंदा मात्र उत्पादन अधिक झाल्याने भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसूऐवजी डोळ्यांत अश्रू आहेत. विदर्भातील शेतकरी पुण्यात आले असून, गुंतविलेले पैसे तरी हातात पडावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.
विजयादशमीला (दसरा) झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. दसऱ्याला घराघरांत झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पूजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. त्या माध्यमातून सणासाठी शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे येतात; परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी निराशा केली असून, उत्पादन खूप झाल्याने झेंडूचे दर चांगलेच कोसळले आहेत. त्यामुळे झेंडूला ‘भाव’च आलेला नाही.
झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शेतकरीवर्ग शहरात दाखल झाला आहे. हिंगोली, बीड, धाराशिव, वाशिम भागांमधून शेतकरी आले आहेत. शेतकरी ओम देवकर (रा.वाशिम) म्हणाले, दसरा आणि दिवाळी सणांचे नियोजन करून दीड एकर झेंडूची लागवड केली. तीन दिवसांपूर्वी काढणीला सुरुवात केली. आज सकाळीच पुण्यात आलो. जवळपास २०० क्रेट फुले विक्रीसाठी आणली आहेत. त्यासाठी १८ हजार रुपये मजुरी द्यावी लागली. तर पुण्यात येण्यासाठी गाडीचे भाडे २० हजार रुपये द्यावे लागले. या सगळ्यात फुलांचे दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे संपूर्ण खर्च देखील निघत नसल्याची खंत देवकर यांनी व्यक्त केली.
यंदा परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे नुकसान झाले नाही. त्यामुळे उत्पादन आणि फुलांचा दर्जा चांगला आहे. पण, दर कमी आहेत. हेच चित्र मागच्या वर्षी वेगळे होते. परतीच्या पावसामुळे बऱ्यापैकी फुलांचे नुकसान झाल्याने झेंडू फुलांची आवक कमी झाली होती. गेल्यावर्षी हेच दर ७० ते १०० रुपयांपर्यंत होते. दिवाळीत चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा असल्याचे देखील देवकर यांनी सांगितले.
पुणे शहरात वाशिम, अमरावती, यवतमाळ, हिंगोलीसह राज्याच्या विविध ठिकाणांहून फुलं विक्रीसाठी आली आहेत. त्यांच्या भागात मार्केटचा अभाव असल्याने त्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ चांगली मिळेल, त्यामुळे ते ३०० ते ४०० किमीचा पल्ला गाठत पुण्यात दाखल झाले आहेत.