लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विवाहानंतर त्यांना आपली पत्नी डावखोरी असल्याचे समजले. त्यावरून त्याने व त्याच्या आईने विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उजव्या हाताने काम करायचे, असा दम देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या फिर्यादीनंतर वानवडी पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यानंतर, ती शेवाळवाडी फाटा येथे पतीच्या घरी आली. पती व सासूला ती डावखोरी असल्याचे समजले. त्यांनी तू डावखोरी आहे, असे म्हणून उजव्या हाताने काम करायचे आहे, असा दम भरून मानसिक व शारीरिक त्रास दिला, तसेच पतीने, तुझ्या वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर घटस्फोट देईल, असे म्हणून मारहाण केली, तसेच पतीने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. फिर्यादीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज केले.