बावडा : सासरच्या वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध बावडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृताचे वडिल पांडूरंग दामू राऊत (रा. इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नवरा सचिन दत्तात्रय कुर्डे, सासरा दत्तात्रय राघू कुर्डे, सासू जायबाई दत्तात्रय कुर्डे, दीर राहुल दत्तात्रय कुर्डे, नणंद आश्विनी दत्तात्रय कुर्डे यांचा समावेश आहे. यापैकी चौघांना बावडाचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांनी तत्काळ ताब्यात घेतले. मृत अमृता हिने काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राऊंडअप हे शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध घेतल्याने तिला उपचारार्थ अकलूज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ५ वाजता तिचे निधन झाले. या घटनेने अमृताच्या माहेरचे लोक प्रक्षुब्ध झाले होते. तिचे अंत्यसंस्कार घराच्या ओट्यावरच करण्याचा निर्धार केला होता त्यामुळे वातावरण तापले होते. मात्र इंदापूरचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी परिस्थिती हाताळून माहेरच्यांची समजून काढली व वातावरण शांत केले. नंतर घरालगतच्या मौकळ्या प्रांगणात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अमृता हिचा सुमारे अडिच वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना शौर्य नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. तिला सुरुवातीस चांगले वागवण्यात आले. मात्र नंतर तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच खर्च केला नाही, घरात काम करत नाही, हुंड्याचे राहिलेले एक लाख रुपये माहेरुन आणत नाही या कारणांवरून शिविगाळ, दमदाटी, मारहाण करुन शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच उपाशीपोटी ठेवले. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची त्यावरून आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सजन हंकारे करीत आहेत.
शौर्यचा हंबरडामृत अमृता हिस सुमारे दीड वर्षाचा शौर्य नावाचा मुलगा आहे. आपल्या आईचा मृतदेह चितेवर ठेवला, त्यावेळी त्याच्या हातूनच आईला पाणी पाजण्यात आले. हे भीषण दृष्य बघून या चिमुरड्याने आई-आई म्हणत हंबरडा फोडला. हे दृष्य बघून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. तर महिलांनीही आक्रोश केला.