तळेगाव ढमढेरे : गूळ खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे बाजार समितीचे लायसन्स आवश्यक असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अरुण साकोरे यांनी दिली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात प्रशासकीय बैठकीत साकोरे बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, शिरूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण शिरूर तालुका असून, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुळाची खरेदी-विक्री होत आहे. शिरूर तालुक्यात व्यापार करण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स (अनुज्ञप्ती) न घेता जर मालाची थेट खरेदी केली. तर अशा व्यवहारांमध्ये गूळ उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरच्या कृषी उत्पन्नाच्या व्यापारासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील कलम ७ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती (लायसन्स) घेऊन व्यापार करावा.जर लायसन्स न घेता शिरूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गुळाचे व्यापारी माल खरेदी-विक्री व्यवहार करताना आढळून आले तर अशा व्यापाऱ्यांवर कायदा कलम ३२ ‘अ’मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गुळाची ठोक खरेदी-विक्रीचे व्यवसाय करणाऱ्यांनी बाजार समिती शिरूरचे मुख्य कार्यालय शिरूर व उपबाजार तळेगाव ढमढेरे येथे बाजार समितीचे कार्यालयात त्वरित (दि. ३१ जानेवारी २०२५ पूर्वी) संपर्क करून अनुज्ञप्ती (लायसन्स) घेऊनच व्यापार करावा, असे आवाहन केले.जर मुदतीनंतर लायसन्स न घेता गुळाची ठोक खरेदी करताना व्यापारी आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही बाजार समितीचे प्रशासक अरुण साकोरे यांनी सांगितले. लायसन्सबाबतच्या अधिक माहितीसाठी सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.