पुणे : उद्या (रविवार) सुट्टीचा दिवस आणि राखी पौर्णिमेचा सण असा योग जुळून आल्याने पुणेकरांच्या उत्साहाला उधाण आले आहे. यातच रात्री आठपर्यंत खरेदीसाठी दुकाने आणि मॉल्स खुले झाल्याने भावा-बहिणींच्या आनंदात अधिकच भर पडली आहे. कोरोनामुळे गतवर्षी राखी पाैर्णिमेसाठी भाऊ बहिणीकडे जाऊ शकले नव्हते. यंदा मात्र बहिणीकडे सहकुटुंब जाण्यासाठी बेत आखण्यात आले आहेत. लाडक्या बहिणीला देण्यासाठी भेटवस्तू आणि राख्या खरेदीसाठीची गर्दी तसेच सणाला ‘गोडधोड’ करण्याची प्रथा असल्याने मिठाईच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगा असे चैतन्यमयी वातावरण शनिवारी (दि. २१) बाजारपेठेत पाहायला मिळाले.
उद्या (दि. २२) श्रावण महिन्यातील पौर्णिमेची तिथी आहे. भाऊ-बहिणींच्या उत्कट प्रेमाचे प्रतीक असलेली राखी पाैर्णिमा आणि समुद्र किनाऱ्यावरील मासेमाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘नारळी पौर्णिमेचा सण यादिवशी उत्साहात साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भावा-बहिणींना हा सण साजरा करता आला नाही. भावांना येता न आल्याने बहिणी काहीशा हिरमुसल्या होत्या. यंदा कोरोनाबाबतची स्थिती समाधानकारक असल्याने आणि अनेकांचे कोरोनाचे एक किंवा दोन डोस झाले असल्यामुळे राखी पाैर्णिमा उत्साहात साजरी केली जाणार आहे. बहिणींनी भावाला सहकुटुंब येण्याचे आमंत्रण दिल्याने जेवणात गोड पदार्थ कोणते करायचे? याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. यादिवशी अनेकांकडे ‘नारळी भात’ करण्याची प्रथा आहे. चक्का, श्रीखंड, जिलबीसारख्या गोड पदार्थांच्या खरेदीसाठी देखील मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. राख्या खरेदीसाठी तरुणी आणि महिलादेखील घराबाहेर पडल्या होत्या.
----------------------------------------