इंदापूर (कळस) : गेली ५२ दिवसांपासून लाँकडाऊनमुळे बंद असलेली इंदापुरची शहरातील बाजारपेठ मंगळवारी सुरु करण्यात आली. बारामती प्रमाणेच रोटेशन पद्धतीने व्यवहार सुरू राहणार आहेत. प्रांताधिकारी कार्यालयाने बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात रुग्ण नसतानाही इंदापूरला रेड झोन मध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण अर्थकारण थांबले होते. त्यामुळे बाजारपेठ सुरु करण्यात यावी अशी मागणी व्यापारी वर्गातुन होत होती. व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, मुकुंद शहा, भरत शहा,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नरेंद्र गांधी सराफ, सराफ संघटनेचे श्रीनिवास बानकर, यांनी तहसिलदार मेटकरी यांची भेट घेवून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनाही विनंती करण्यात आली होती. त्यामुळे प्रांताधिकारी कांबळे यांनी सोमवारी उशिराने काही अटींवर बाजारपेठ सुरु करण्यास संमती दिली. याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार व गुरुवार वाहनांचे सर्व्हिसिंग, संगणक, इलेक्ट्रॉनिक, रेडिमेड, फर्निचर, मोबाईल, फोटो स्टुडिओ, स्वीट होम, फुले व पुष्पहार दुकाने, मंगळवार व शुक्रवार कापड दुकाने, भांडी, शिलाई,फुटवेअर, सोन्याचांदीचे दुकाने,घड्याळे, सुटकेस व बॅगा, दोरी, पत्रावळी, बुधवार व शनिवार स्टेशनरी, कटलरी,स्टील, टायर्स, सायकल, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, झेरॉक्स, डिजिटल फ्लेक्स, प्रिंटिंग प्रेस, माती व भांड्यांची दुकाने, टोपल्या व बांबूची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जीवनावश्यक सेवेतील किराणा माल, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी, बियाणे औषधे रविवार वगळून दररोज सुरू राहतील. मात्र , ठरलेल्या दिवशी सर्व दुकाने सकाळी ८ ते सांयकाळी ६ पर्यंतच चालु राहतील.मात्र, ही दुकाने सुरू करताना काही बंधने पाळावी लागणार आहेत. यात ग्राहकांनी मास्क वापरणे, ग्राहकांना सॅनिटायझर सुविधा देणे, थर्मामीटरचा वापर करणे, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक लिहून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.