लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून निर्बंध असल्याने शनिवारी, रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजार बंद होता. तो आता वीकेन्डचे निर्बंध रद्द झाल्याने पुन्हा खुला झाला आहे. पण कामगार संघटनांनी पार्किंग शुल्कावरून पुकारलेल्या बंदमुळे रविवारी (दि. ३०) शेतमालाची तुरळक आवक झाली. बाजार समितीने टेम्पोचालकांची होणारी लूट थांबविण्यासाठी अधिकृत भाडे वसुली व कामगार संघटनांच्या कार्यालयांना भाडे आकारणी केल्याने कामगार संघटनांकडून त्याचा निषेध व्यक्त होत आहे. बाजार बंदबाबत प्रशासन आणि पोलिसांनी समज दिल्याने बंद मागे घेण्यात आला. यामुळे सोमवारपासून (दि. ३१) व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून भाजीपाला खरेदीदार वाहनचालकांकडून शेतमाल लावणे, वाहने लावणे, वाहनांची देखरेख करणे या नावाखाली १०० ते २०० रुपये आकारण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या. हा प्रकार प्रशासक मधुकांत गरड यांच्या निदर्शनास आल्यानंतर या बेकायदा वसुलीस आळा घालण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली व अधिकृत भाडेवसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार बाजार समिती प्रशासन अधिकृतरीत्या ५० रुपये शुल्क आकारणी करणार होती. मात्र या निर्णयाला कामगार संघटनांनी विरोध दर्शविला.
याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासन, पोलीस प्रशासन, अडते असोसिएशन, विविध कामगार संघटनांची शनिवारी (दि. २९) बैठक झाली. या बैठकीत बाजार सुरु करण्याचे ठरले. मात्र रविवारी (दि. ३०) कामगार संघटनांनी पुन्हा बैठक घेत आपली भूमिका ठरविण्यासाठी वेळ मागितला होता. दरम्यान, रविवारी पुन्हा कामगार संघटना, पोलीस आणि बाजार समिती प्रशासनात बैठक होऊन, बाजार समितीने केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी कामगार संघटनांकडून सूचना मागविल्या आहेत. त्या सूचनांवर विचार करून नियमांमध्ये शिथिलता आणली जाईल. मात्र नियम रद्द केले जाणार नसल्याचे प्रशासक गरड यांनी स्पष्ट केले. यानंतर कामगार संघटनांनी सोमवारपासून (दि. ३१) बाजार व्यवहार सुरळीत ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
-----
बाजार सुरू होऊनही तुरळकच आवक
कोरोना टाळेबंदीचे नियम स्थानिक प्रशासनाने शिथिल केल्यानंतर रविवारी (दि. ३०) बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवले होते. मात्र कामगार संघटनांच्या बंदबाबत संभ्रमावस्था असल्याने बाजारात भाजीपाल्याची केवळ २० ट्रक आवक झाली होती. तर बटाट्याची केवळ २ ट्रक, तर कांद्याचा एकही ट्रक आला नाही.
---
बेकायदा वसुली केल्यास तक्रार करा
बाजार आवारातील टेम्पोचालकांकडून होणारी अवैध वसुली रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने अधिकृत निविदा काढली आहे. त्रयस्थ संस्थेकडून नाममात्र शुल्काची अधिकृत आकारणी करण्यात येणार आहे. याद्वारे बाजार समितीला दीड कोटींचा महसूल मिळणार आहे. तर टेम्पोचालकांकडून आता होणारी १०० ते २०० रुपयांची लूट रोखली जाणार आहे. टेम्पोचालकांना याबाबत सतर्क करण्यासाठी २ हजार पत्रके प्रत्येक टेम्पोचालकांना दिली आहेत. जर कोणी अवैधरीत्या पैसे घेत असल्यास त्याची तक्रार पोलीस ठाणे आणि बाजार समितीकडे करावी, असे आवाहन केले.
- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे बाजार समिती.
-------
बाजार समिती प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही कामगार संघटनेकडून टेम्पोचालकांकडून पैशांची आकारणी होत नाही. काही घटना घडल्या असतील तर त्या व्यक्तींचा संघटनांशी संबंध नाही. अशा घटना घडत असतील तर त्या बाजार समिती प्रशासनाने सिद्ध कराव्यात. आणि संबधितांविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. गुन्हे दाखल करायला आम्ही देखील येऊ. मात्र कामगार संघटनांना बदनाम करू नये.
- संतोष नांगरे, कामगार संघटना प्रतिनिधी
---------