यावर्षी कांद्याचे बाजारभाव नेहमीच अस्थिर राहिले आहेत. सुरुवातीला खूपच कमी बाजारभाव मिळाला. त्यावेळी कांद्याचे भांडवल शेतकर्यांच्या अंगावर आले. मध्यंतरी कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला. दहा किलोला बाराशे रुपये असा आतापर्यंत सर्वाधिक भाव कांद्याला मिळाला होता. मात्र नंतर हे बाजारभाव कमी कमी होत गेले. शेतकऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक राहिलेला नाही. अवकाळी पाऊस तसेच निसर्गाने साथ दिली नसल्याने नवीन कांदा लागवड खूपच कमी क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे कांद्याची आवक खूपच कमी होत आहे. आज गुरुवारी ही आवक दीड हजार पिशवी झाली. दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी होत चालली आहे. इतर वर्षांची तुलना करता डिसेंबर महिन्यात कांदा आवक घटते. मात्र इतर सीजनपेक्षा यावेळी आवक जास्तच घटली आहे. कांद्याचे भाव आज काहीशे वाढले आहेत. एक नंबर गोळा कांदा दहा किलोला २८० ते ३११ रुपये, दोन नंबर कांदा २०० ते २८० रुपये, गोल्टी कांदा १५०ते २०० रुपये, तर बदला कांदा ८० ते १५० रुपये या भावाने विकला गेल्याची माहिती सचिव सचिन बोराडे यांनी दिली. नवीन वर्षात कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
कांद्याच्या बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:07 AM