रावणगाव : भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण मानला जाणारा आणि बैलांप्रति कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा भाद्रपदी बैलपोळा हा सण संपूर्ण पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. ८) साजरा होत आहे. पोळ्यानिमित्त रावणगाव (ता. दौैंड) येथील बाजारपेठ सज्ज झाली आहे. ज्यांच्याकडे बैल आहेत, असे शेतकरी बैलांची विधिवत पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. तर, ज्यांच्याकडे बैल नाहीत असे लोकदेखील बैलांप्रति कृतज्ञता दाखविण्यासाठी मातीचे अथवा लाकडाचे तयार केलेले बैल पुजतात.
पुरातन काळापासून शेती आणि शेतकरी असे समीकरण रुजलेले आहे. शेतीच्या अनेक कामांमध्ये बैलांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे वर्षभर शेतामध्ये राबणाºया बैलांप्रति कृतज्ञता म्हणून पुरातन काळापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपदी अमावास्येला पोळा हा सण साजरा केला जातो.बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी हळद आणि तूप यांचे मिश्रण बैलांच्या खांद्याला लावले जाते. यालाच खांदमळणी असे म्हणतात.या वेळी गोडेतेल आणि गुळापासून तयार केलेली गुळवणीदेखील बैलांना पाजली जाते. बैलपोळ्याच्या अगोदर प्रत्येक शेतकºयांच्या दारात दावण आणि अंब्याच्या पानांपासून तयार केलेले तोरण बांधले जाते.अंगभर चित्र : शिंगांना हिंगूळ व बेगीडप्रत्यक्ष बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ पाणी आणि साबणाने अंघोळ घातली जाते.यानंतर शिंगांना हिंगुळ आणि रंगी बेरंगी बेगीड लावले जातात.तसेच बैलांच्या संपूर्ण अंगावर विविध रंगांच्या माध्यमातून कला कृती काढल्या जातात.या दिवशी बैलांना कामाला जुंपले जात नाही. मिरवणुकीच्या वेळी लोखंडी चाळ, नवीन मोरक्या शिंगाला शेंम्ब्या , घुंगरू, रेशीम गोंडे, बाशिंग चढवून नंतर सायंकाळी गावच्या ग्रामदैवतांपर्यंत बैलांची गाजत वाजत मिरवणूक काढली जाते.ही बैलांची मिरवणूक पहाण्यासाठी गावोगावी लोक मोठ्याप्रमाणावरती गर्दी करतात. त्यानंतर बैलांना घरी नेहून पूजा करूनगाई सोबत त्यांचे लग्न लावले जाते आणि पुरण पोळीचा नैवद्य बैलांना खायला दिला जातो. या बैल पोळा सणाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील गावोगावच्या बाजारपेठा बैलांच्या रंगी बेरंगी साहित्याने सजलेल्या सर्वत्र पहावयास मिळत आहेत.