तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे प्रशासनाच्या बाजार बंदच्या सूचना असतानाही तिसऱ्या वेळी व्यापाऱ्यांनी नियम धुडकावून बाजार भरवल्याने पुन्हा एकदा नियमांचा फज्जा उडाला. तालुक्यातील अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शिरूर तालुक्यातील आठवडे बाजार बंद करण्याबाबतचे शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी सर्व मंडल अधिकाऱ्यांना आदेश देत बाजार बंद ठेवण्याबाबत २२ मार्च पूर्वी सांगितलेले आहे. अद्याप आठवडे बाजार सुरू करण्याबाबत कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत.
मात्र, असे असतानादेखील शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि महत्त्वाचे गाव समजल्या जाणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथे कोरोनाबाधितांची मोठी संख्या असतानाही बाजार मैदानात भाजीपाल्यासह इतर व्यापाऱ्यांनीही दुकाने थाटून आठवडे बाजार भरवल्याने पुन्हा एकदा नियमांचा फज्जा उडाला. ही बाब गावकामगार तलाठी व ग्रामपंचायत प्रशासनाला समजताच पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बाजारातील व्यापाऱ्यांना बाजार बंद करण्याच्या सूचना देऊनही व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, मुख्य बाजारपेठेतील नियम मोडणाऱ्या काही दुकानदार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले.
एकीकडे तळेगाव ढमढेरे गावाने कोरोनाकाळामध्ये अनेक दिवस गावातील सर्व बाजारपेठ व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून शिरूर तालुक्यात आदर्श निर्माण केलेला असताना याअगोदर अशाच प्रकारे २२ मार्च व ३ मे रोजी तहसीलदारांचा आदेश मोडून बाजार भरविण्यात आलेला होता. त्याचीच आज तिसऱ्यांदा (दि.२१) पुनरावृत्ती झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बाजारामध्ये व्यापाऱ्यांना बाजार बंद करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सूचना देऊनही हे व्यापारी ऐकत नाहीत. त्यामुळे आठवडी बाजार भरला गेला.
-ज्ञानेश्वर भराटे, तलाठी, तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे येथे आठवडे बाजारात व्यापारी व ग्राहकांची उसळलेली गर्दी.