तळेगाव ढमढेरे: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार लैला शेख यांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत तळेगाव ढमढेरे येथे आठवडे बाजार, तसेच जनावरांचा बाजार भरला. विशेष म्हणजे, बाजारात कोरोना नियमांना तिलांजली दिल्याचेच चित्र पहावयास मिळाले. दरम्यान,
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. शिरूर तालुक्यातील बाधितांची वाढती संख्यात लक्षात घेता तहसीलदार लैला शेख यांनी तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ, न्हावरे ,कोरेगाव-भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी ,रांजणगाव गणपती, कोंढापुरी ,मांडवगण फराटा ,निमोने, शिरुर नगर परिषद ,ग्रामीण शिरुर, सरदवाडी, कारेगाव या १५ गावांतील आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दोनच दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, या आदेशाला व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
बंदी असतानाही तळेगाव ढमढेरे येथे सोमवारी आठवडे बाजार भरला. जनावरांचा बाजार देखील भरवण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी गर्दी पहायला मिळाली. कोरोना नियमांना तिलांजली दिल्याचे चित्र पहायला मिळत होते. दरम्यान जनावरांच्या बाजारातील काही व्यावसायिकांनी संवाद साधला असता प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दुपारी ग्रामपंचायतील बाजार भरल्याचे समजताच त्यांनी व्यावसायिकांना घरी जाण्याच्या सूचना केल्या. त्यांनतर बाजार तळावर शुकशुकाट दिसत होता.
तळेगाव ढमढेरे येथे बंदचे आदेश असल्याने आम्ही गावातून बाजार बंदबाबत दवंडी दिली होती,परंतु बाहेरगावातून आलेल्या लोकांनी बाजार भरवला त्यांनतर सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांसह बाजारात आलो व आम्ही भरलेला आठवडे बाजार बंद केला.
संजय खेडकर,ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत,तळेगाव ढमढेरे
२२ तळेगाव ढमढेरे
बंदीचे आदेश असताना देखील तळेगाव ढमढेरे येथे भरलेला आठवडे बाजार.