नीरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश शिथिल केले नसताना, पुरंदर तालुक्यातील नीरा येथील आठवडे बाजार बुधवार (दि. १६) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी सहापर्यंत भरला होता.
नीरेतील आठवडे बाजार सुरू होताच ग्रामपंचायतीने ठेका दिलेल्या ठेकेदाराने बाजारकर वसूल करून एक प्रकारे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्लीच केली आहे. आठवड्याचे सातही दिवस येथे भाजी मंडई सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत नियमित भरते. मागील दोन आठवड्यांत या भाजी मंडई परिसरातील शेतकऱ्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे स्थानिक भाजी विक्रेतेच फक्त मनमानी पद्धतीने चढ्यादराने भाजी विकतात.
आठवडे बाजार भरणार नसल्याची दवंडी मंगळवारी रिक्षातून देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेत बाजार बंदची दवंडी दिली. परंतु दुसऱ्या दिवशी बुधवारी ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आठवडे बाजार भरलाच कसा, असा प्रश्न नीरेकर ग्रामस्थ विचारत आहेत. सकाळी आठ वाजता आठवडे बाजार भरल्यावर एकाही भाजी विक्रेत्याने कोरोनाचे साधे नियमही पाळले नाहीत. एकाही विक्रेत्याने मास्क लावला नव्हता. कळस म्हणजे प्रत्यक विक्रेत्यांच्या तोंडात काहीतरी होते व ते दर पाच मिनिटांनी भर बाजारात पिचकाऱ्या मरताना दिसून आले.
नीरा ग्रामपंचायतीने मंगळवारी दवंडी देत आठवडे बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले, पण नीरा शहरातीलच बुवासाहेब मंदिराशेजारी अवैधरित्या भाजी मंडई भरवली गेली. ही भाजी मंडई तर सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. तीही कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत. पोलीस व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने या भाजी मंडईकडे सोयीस्करपणे डोळेझाक केल्याचे जाणवत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत नीरा (ता. पुरंदर) येथील बाजारतळावर सकाळी आठ वाजताच आठवडे बाजार भरला होता. (छाया : भरत निगडे)