पुणे : शहरामध्ये २५ शेतकरी आठवडे बाजार भरविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यानुसार आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे धोरण तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. आठवडे बाजार सुरू झाल्यास नागरिकांना स्वस्त भाजीपाला उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची मुभा राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने त्यांना सेवा उपलब्ध करून देण्याकरिता आठवडे बाजाराची संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आठवडे बाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी आॅगस्ट महिन्यामध्ये पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.शहरात काही ठिकाणी खासगी जागांमध्ये आठवडे बाजार भरण्यास सुरूवात झाली आहे. या बाजारामुळे थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना माल उपलब्ध होत असल्याने त्यांना स्वस्त किमतीमध्ये भाजीपाला मिळत आहे. हीच आठवडे बाजाराची संकल्पना आता संपूर्ण शहरात २५ ठिकाणी मोठ्याप्रमाणात राबविली जाणार आहे. याचा चांगला फायदा नागरिकांना, शेतकऱ्यांनाही होणार आहे. पालिकेच्या मोकळया जागांवर कृषी पणन मंडळाकडून भरविण्यात येणाऱ्या जागेंबाबत काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास याबाबत प्रशासकीय निर्णय घेण्याचा किंवा या जागेचा भाडेकरार रद्द करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना असणार आहे, असे ‘शेतकरी आठवडे बाजार महापालिका धोरण २०१६’ या धोरण नियमावलीमध्ये स्पष्ट केले आहे.स्थायी समितीच्या या धोरणास नियमावली मिळाल्यानंतर मुख्यसभेसमोर हा विषय मांडण्यात येणार आहे. मुख्यसभेच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरला विधान परिषदेची आचारसंहिता उठल्यानंतरच यावर पुढील कारवाई होईल. (प्रतिनिधी)
शहरामध्ये सुरू होणार २५ आठवडे बाजार
By admin | Published: November 17, 2016 4:24 AM