पुणे : गुलटेकडीच्या पं. नेहरु रस्त्यावरील वखार महामंडळ चौकामध्ये नियोजित करण्यात आलेला ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपूलाची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला उतरणारा नियोजित पुल रद्द झाला आहे. त्याची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढविण्यात येणार नाही. काम सुरु होण्यापुर्वीच ही प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने खरोखरीच या पुलाची आवश्यकता होती की, केवळ नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहरु रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौककडून गंगाधाम चौकाकडे जाताना लागणा-या डायसप्लॉट ते गिरीधर भवन चौकादरम्यान एका उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार, असल्याने या उड्डाणपूलाची लांबी गंगाधाम चौकापर्यंत वाढवण्याची मागणी व्यापारी आणि स्थानिकांनी केली होती. पालिकेने १५ कोटींच्या ‘वाय’ आकाराच्या उड्डाणपुलाचे नियोजन करुन त्याची निविदा काढली. या पुलामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याने व्यापा-यांनी करीत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत बैठक घेत लांबी वाढविण्याला प्राधान्य दिले होते. शेवटी प्रकल्प विभागाने वाय आकाराच्या उड्डाणपुलाची निविदा रद्द केली.
===
नियोजित ‘वाय’ उड्डाणपुलाचा तपशील -
लांबी ६०६ मीटर
रुंदी रुंदी ५.५० मिटर
गिरीधर भवन चौकाच्या बाजूस १०० मीटर
गंगाधाम चौकाच्या बाजूस १३० मीटर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस ६६.११ मीटर
===
व्यापारी आणि नागरिकांनी ‘वाय’आकाराच्या उड्डाणपुलामुळे समस्या निर्माण होतील, असे निदर्शनास आणून दिले. त्यांना त्रास नको म्हणून ही प्रक्रिया रद्द केली आहे. वास्तविक अत्यंंत नियोजनबद्ध पद्धतीने हा पूल बांधण्यात येणार होता. परंतु, ज्यांच्यासाठी बांधणार आहोत, त्या नागरिकांनाच नको असेल तर आग्रह धरणार नाही. हा पूल रद्द होण्यात राजकारण आणि अपयश नाही. भविष्यात गंगाधाम चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल केला जाणार आहे.
- श्रीनाथ भिमाले, नगरसेवक
===
नागरिकांचा डायस प्लॉट ते गिरीधर भवन चौक या उड्डाणपुलालाही विरोध होता. त्यातच ‘वाय’ आकाराच्या पुलाचा घाट घालण्यात आला. मुळ वाहतूक कोंडीची समस्या सुटणारच नव्हती तरीही पुलाचा अट्टाहास का केला गेला? कोट्यवधींच्या भ्रष्टाचारासाठी असे चुकीचे प्रकल्प रेटले जातात. आधी पूल बांधायला सुरुवात केल्यानंतर जागा ताब्यात घेण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. पुलासाठी सर्वेक्षण, नकाशे तयार करताना या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता. केवळ एका नगरसेवकाच्या अट्टाहासाला प्रशासन बळी पडले.
- बाळासाहेब रुणवाल, स्थानिक नागरिक