पुणे : साखरपुड्यासह लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून लग्न मोडणाऱ्या पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या भावंडांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे 16 जानेवारीपर्यंत त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत पोलिसांना कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस असलेल्या बहीण व भावाने उच्च न्यायालयात परमादेश याचिका दाखल करत गुन्हा रद्द करण्याची विनंती केली होती.
साखरपुडा आणि लग्नात ठरल्याप्रमाणे मानपान करूनसुद्धा वरपक्षाने ऐनवेळी लग्न मोडल्या प्रकरणी वधुपक्षाने वरपक्षाविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली होती. याप्रकरणी, प्राथमिक चौकशीअंती पोलिस असलेल्या वर आणि त्याच्या बहिणीविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा निष्पन्न होत असल्याने समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघेही पोलीस दलात कार्यरत असल्याने हा गुन्हा नोंद झाल्याने त्यांना विभागीय चौकशीला देखील सामोरे जावे लागणार होते. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात परमादेश याचिका दाखल करत गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायमूर्ती पी. डी. नाईक व एन्. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर केली. यावेळी बचावपक्षाच्या वतीने अॅड. तपन थत्ते, अॅड. विवेक आरोटे व अॅड. केतन जाधव यांनी काम पाहिले. याचिकर्त्यांविरुद्ध कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही. संबंधित गुन्हा हा केवळ आकसातून दाखल करण्यात आला आहे असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत पुढील तारखेपर्यंत याचिकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मनाई केल्याचे आदेश पारीत केले आहेत.