पुणे : ’विवाह समुपदेशक आणि जीवनसाथ अभ्यासमंडळाचे प्रमुख सल्लागार अनिल भागवत यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सात महिन्यांपूर्वी भागवत यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांचे हदय कमकुवत झाले होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. भागवत यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. मात्र, त्यांचे हदय उपचाराला विशेष साथ देत नव्हते. मंगळवारी उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल भागवत यांनी अमेरिकेत बांधकाम व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. अमेरिकन ग्रीन कार्ड होल्डर असूनही त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात अतिजलद आणि दर्जेदार बांधकाम व्यवस्थापनाचा अनेक वर्षे व्यवसाय केला. त्यांनी ‘वैवाहिक समुपदेशन’ या विषयात डॉक्टरेटचे काम पूर्ण केले. इंग्लंड आणि अमेरिकेत पालक शिक्षण व विवाह शिक्षणाच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या. जीवनसाथ समुपदेशन केंद्राचे प्रमुख समुपदेशक , पालक विद्यापीठाचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. ‘घर पहावं बांधून’, ‘लग्न पहावं करून’, ‘व्यवस्थापनशास्त्र तुमच्यासाठी’, ‘विवाहज्ञानकोश’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. ‘जीवनसाथ- भाग 10’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या मागे ’बालभवन’च्या संस्थापिका शोभा भागवत, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
विवाह समुपदेशक अनिल भागवत यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 9:44 PM